मकोका कारवाईमुळे बीडमध्ये तणाव, समर्थकांचा आंदोलनेचा पवित्रा

IMG 20250116 080553

बीड, दि. १६: कुख्यात गुन्हेगार वाल्मीक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर त्याला बीड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कराडच्या समर्थनार्थ परळीत सलग दुसऱ्या दिवशी बंद पाळण्यात आला, तर काही आंदोलकांनी टॉवरवर चढून निदर्शने केली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

सरकारी पक्षातर्फे अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी कराडचा गुन्ह्यातील सहभाग अधोरेखित करत १० मुद्दे सादर केले. दुसरीकडे, कराडच्या वतीने अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी बचावात्मक युक्तिवाद मांडला. या प्रकरणाची सुनावणी करताना न्या. सुरेखा पाटील यांनी २२ जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सरकारी चौकशीचे आदेश

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. संतोष देशमुख प्रकरणासाठी माजी न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची चौकशी माजी न्यायाधीश व्ही. एल. आचलिया यांच्यामार्फत होणार आहे.

गर्दी, घोषणाबाजी आणि पोलिसांची रणनीती

न्यायालयाबाहेर कराड समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. काही महिलांनी फाशीची मागणी करत घोषणाबाजी केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवत कराडला न्यायालयाच्या मागच्या दरवाजाने न्यायालयात नेले आणि परत पोलिस व्हॅनमधून कोठडीत रवाना केले.

समर्थकांचे टोकाचे आंदोलन

परळीत बंद पाळणारे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून आले. काही जणांनी टॉवरवर चढून आंदोलन केले, तर अनेक ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणावर सतर्कता बाळगावी लागली.