नाशिक: अन्न व पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल एका व्यक्तीला अंबड पोलिसांनी अटक केली आहे. अंबड पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या निर्देशानुसार, गुन्हे शाखेच्या युनिट १ ने तातडीने तपास करून संबंधित व्यक्तीला जेरबंद केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहा. पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. संशयित आरोपी रविंद्र यशवंत धनक, राहणार साई श्रध्दा कॉलनी, पाथर्डी फाटा, नाशिक याचा आष्टी (जि. बीड) परिसरात शोध घेऊन त्याला नगर-आष्टी रोडवरून अटक करण्यात आली.
सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने त्याला ३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा प्रविण वाघमारे, राम बर्डे, आप्पा पानवळ, सुकाम पवार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.