महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राबवण्यात येणारी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना आता अधिक व्यापक होणार आहे. योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना २९ सप्टेंबर २०२४ पासून थेट बँक खात्यात (DBT) हस्तांतरित केले जाणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्रालयात एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्यभरातील लाभार्थ्यांसाठी तिसऱ्या हप्त्याचे वितरण कसे सुचारू होईल यावर चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री तटकरे यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात २९ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा एक भव्य राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात महिलांच्या यशोगाथा सादर केल्या जातील तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या व्यवस्थापनासाठी विविध विभागांच्या प्रमुखांसोबत चर्चा करण्यात आली. मंत्री आदिती तटकरे यांनी व्यासपीठ व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन, कार्यक्रमस्थळी पार्किंगची सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय आणि लाभार्थ्यांच्या यशोगाथांचे सादरीकरण यासंबंधी सखोल सूचना दिल्या आहेत. या सर्व गोष्टींची उत्तमरीत्या आखणी करून महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलण्यात येणार आहेत.
योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण बनवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून, या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांच्या यशोगाथा राज्यभरातील महिलांना प्रेरणा देतील, असेही मंत्री तटकरे यांनी या बैठकीत सांगितले.