नाशिक पश्चिममध्ये मनसेत बंडाचे वारे; दिलीप दातीरांचा राजीनामा

Those with Manset Bandache in Nashik West; Dilip Datirancha Resignation

नाशिक : नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात उमेदवाराची घोषणा करण्यात आली. उमेदवारीची घोषणा होताच मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरु झाले आहे. आयात केलेल्या उमेदवाराला उमेदवारी देऊन एकनिष्ठ कार्यकर्त्याला डावलले गेल्याची चर्चा सुरु झाली. आणि या नाराजी नाट्याचा पहिला अंक मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि पश्चिम मतदार संघातून मनसेकडून इच्छुक असलेले दिलीप दातीरांनी पक्षाचा राजीनामा देत सुरु केला आहे. यामुळे मनसेला नाशिकमध्ये हा पहिला आणि मोठा झटका मानला जात आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी करीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरु केली होती. नाशिकमध्ये देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीची तयारी केली होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला रामराम करून दिनकर पाटील हे मनसेच्या इंजिनमध्ये बसले. राज ठाकरे यांनी देखील उमेदवारांची यादी जाहीर करताना नाशिकमधून पहिला उमेदवारीचा हार दिनकर पाटलांच्या गळ्यात घातला. यामुळे एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाट्य सुरु झाले.

नाराजी नाट्याची सुरुवात मनसेचे माजी जिल्ह्याध्यक्ष दिलीप दातीर यांनी पक्षाचा राजीनामा देत केली. त्यांनी मनसेच्या पक्षाचा राजीनामा देत असल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि मनसेतील नाराजीची खदखद सर्वत्र दिसू लागली. अनेक मनसैनिकांनी देखील त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ऐन निवडणुकीच्या काळात बाजूला सारून फक्त उमेदवारी घेण्यासाठी पक्षात आलेल्यांना रेड कार्पेट टाकले जात असल्याच्या भावना चौकाचौकात व्यक्त केल्या जात आहे.

दिलीप दातीर यांच्या राजीनाम्यामुळे मनसेचे उमेदवार दिनकर पाटलांना मोठा फटका बसणार आहे. कारण दिलीप दातीर हे नगरसेवक म्हणून यापूर्वी निवडून आलेले आहे. यांच्या मागे अंबड परिसरातील मतदारांची मोठी ताकद असल्याचे बोलले जात आहे. तसेच, त्यांच्या मागे कामगार वर्ग देखील मोठा असल्याने याचा फटका मनसेच्या उमेदवाराला बसणार यात शंका नाही. पहिलेच या मतदार संघात अनेक दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. यामध्ये महायुतीकडून भाजपच्या सीमा हिरे, महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे सुधाकर बडगुजर, छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षाकडून दशरथ पाटील, मनसेकडून दिनकर पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले आहे.

पश्चिम मतदार संघात माजी आ. डॉ. अपूर्व हिरे यांनी उबाठा गटात प्रवेश केल्याने बडगुजर यांना मोठा बूस्ट मिळाला आहे. त्यातच दिलीप दातीर हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. दातीर हे उबाठा शिवसेनेत गेल्यास सुधाकर बडगुजर यांच्या विजयाचे गणित नक्कीच जुळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे दातीर काय भूमिका घेता याकडे नाशिकच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.