पंचवटीतील आडगाव शिवारातील कोणार्कनगर परिसरात चोरट्यांनी दोन बंद घरे लक्ष्य करत तब्बल ४.५३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
बालाजीनगरमधील मुकुंदराव आनंदराव हिरे हे कामानिमित्त बाहेर असताना त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व लाखोंची रोकड लंपास केली. त्याचबरोबर प्रल्हाद भिला जाधव यांच्या घरालाही लक्ष्य करत मोठ्या रकमेचा ऐवज चोरून नेला.
काय लंपास झाले?
हीरे यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड मिळून ४.५३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी हातोहात पळवला.
कोणार्कनगर परिसरात रात्रीच्याच सुमारास घडलेल्या या घरफोडीने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची तक्रार आडगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांनी घटनास्थळी तपासणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे. चोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.
पोलिसांनी नागरिकांना घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे, दारांचे मजबूत कुलूप वापरण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. चोरट्यांना लवकरात लवकर पकडून परिसरात विश्वास निर्माण करणे, ही सध्या पोलिसांपुढील मोठी जबाबदारी आहे.