नाशिक रोड : पंचवटी आणि राज्यराणी एक्सप्रेसच्या रोजच्या विलंबामुळे त्रस्त मासिक पासधारक आणि प्रवासी वेल्फेअर असोसिएशनने अखेर मध्य रेल्वेला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संघटनेच्या सल्लागार ॲड. क्रांती गायकवाड-कांबळे यांनी ही नोटीस बजावली. संघटनेचे अध्यक्ष राजेश फोकणे, उपाध्यक्ष किरण बोरसे, सचिव संजय शिंदे, कार्याध्यक्ष कैलास बर्वे, नितीन जगताप, रतन गाढवे, सुदाम शिंदे, संतोष गावंदर, सुनील केदारे, गणेश नागरे, उज्वला कोल्हे आदींनी या विषयावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यराणी एक्सप्रेस आणि पंचवटी एक्सप्रेस या नाशिककरांसाठी महत्त्वाच्या इंटरसिटी ट्रेन आहेत. परंतु मागील काही महिन्यांपासून या गाड्या दररोज अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. यामुळे नाशिकहून मुंबईला कामासाठी जाणाऱ्या शासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचण्यास उशीर होतो, परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होते आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो.रेल्वे प्रशासनाकडे निवेदने दिल्यानंतरही या समस्येवर समाधानकारक उपाययोजना झाली नाही, त्यामुळे अखेर कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात आला. नोटीसमध्ये पंचवटी एक्सप्रेसचा हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेससोबत शेअर केलेला रेक आणि राज्यराणी एक्सप्रेसला मुंबई विभागात मिळणारी दुय्यम वागणूक तसेच अपुरी आसन व्यवस्था यावरही लक्ष वेधले आहे. जर यावर तातडीने योग्य उपाययोजना करण्यात आली नाही, तर संघटनेने ग्राहक मंचाकडे दाद मागून नुकसानभरपाईची मागणी करण्याचा इशारा दिला आहे
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
