ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक महान व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. त्यांच्या निधनाने मानवता, दातृत्त्व, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदनेत व्यक्त केले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
रतन टाटा हे केवळ यशस्वी उद्योजक नव्हते तर त्यापेक्षा समाजाच्या प्रगतीसाठी आणि मानवतेच्या हितासाठी नेहमीच तत्पर असणारे व्यक्तिमत्त्व होते. शिक्षण, ग्रामोन्नती, कुपोषण आणि आरोग्य या क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच सामाजिक आणि मानवतेच्या विकासात त्यांनी दिलेला हातभार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
रतन टाटा यांनी कायमच समाजातून कमावलेले समाजालाच परत करण्याच्या भावनेने कार्य केले. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत किंवा अलिकडे मुंबईत प्राण्यांसाठी उघडलेले रुग्णालय, त्यांच्या करुणावृत्तीचे दर्शन देणारे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री असताना व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशनची स्थापना केली तेव्हा रतन टाटा सातत्याने त्या बैठकींना हजेरी लावत असत आणि राज्य सरकारसोबत सक्रियपणे काम करत होते.
नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना करताना त्यांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा हे अनमोल होते. राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे आयोजन करतानाही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे त्यांच्या जाण्याने देशाच्या उद्योगविश्वासोबतच समाजातील दातृत्त्व आणि विश्वासार्हतेचा एक आधारस्तंभ हरपला आहे.