राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना ताप आणि घशाचा संसर्ग झाल्यामुळे आज अधिक त्रास जाणवल्याने पुण्यातून थेट मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भुजबळ हे पुणे दौऱ्यावर होते, जिथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी तातडीने मुंबई गाठली.
सध्या छगन भुजबळ यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या कार्यालयातून कळवण्यात आले आहे. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू असून, त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.