Nashik Accident: नाशिक-मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल आणि जखमींवरील उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. नाशिकमधील द्वारकानजीक उड्डाणपुलावर भाविकांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात सिडकोतील पाच जणांना प्राण गमवावे लागले. त्यामध्ये वडील आणि मुलाचादेखील समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की, मृतदेह पाहणाऱ्यांना अक्षरशः भोवळ आली. अपघाताचे वृत्त कळताच जिल्हा रुग्णालयात कुटुंबीयांनी धाव घेत एकच आक्रोश केला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
दरम्यान, या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक खोळंबल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उड्डाणपुलावर भीषण अपघात झाल्याचे समजताच मुंबईनाका, भद्रकाली पोलिसांसह अग्निशमन दलाची वाहने, वाहतूक पोलिसांची वाहने रुग्णवाहिका एकापाठोपाठ सायरन वाजवत द्वारका चौकातून उड्डाणपुलाचा रॅम्प चढू लागल्या. यामुळे द्वारका चौक, झाकिर हुसेन रुग्णालयरोड, कन्नमवार पुलाच्या परिसरातील गॅरेज व्यावसायिकांसह अन्य नागरिकांनीही उड्डाणपुलावर धाव घेतली. यावेळी आपत्कालीन बचावकार्यात प्रत्येकाने झोकून दिले.