भारताचा सुवर्णपदक विजेता आणि ॲथलेटिक्समधील स्टार खेळाडू नीरज चोप्राने Neeraj Chopra विवाहबंधनात अडकून सर्वांना सुखद धक्का दिला आहे. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरजने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या लग्नाची घोषणा केली. नीरजने पत्नी हिमानीसोबतचे विवाहसोहळ्याचे फोटो शेअर करत लिहिले, “माझ्या कुटुंबासह आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. या क्षणासाठी आम्हाला आशीर्वाद देणाऱ्या सर्वांचे आभार!”
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नीरज चोप्राचा Neeraj chopra गुप्त विवाह
ह्या खासगी समारंभात केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. नीरजने आपल्या लग्नाचा क्षण खास ठेवल्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. सोबतच, नीरजने आपल्या आईने हळद लावतानाचा सुंदर फोटो शेअर करत हा सोहळा कुटुंबासाठी किती खास होता हे अधोरेखित केले.
नीरजचे खेळातील सुवर्णयुग
नीरज चोप्रा Neeraj chopra हा भारताचा गौरव आहे. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा नीरज, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्यपदकानेही चमकला. पॅरिसमध्ये त्याने 89.45 मीटर भालाफेक करत दुसरे स्थान पटकावले, तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले.
नीरज आणि हिमानी: नवा अध्याय
नीरजच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता होती. लग्नानंतर हिमानीबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. आता चाहत्यांच्या नजरा या नव्या जोडीच्या आगामी प्रवासाकडे लागल्या आहेत.
“ट्रॅक अँड फील्ड न्यूज”ने केला गौरव
2024 मध्ये नीरज चोप्राला अमेरिकन मासिक “ट्रॅक अँड फील्ड न्यूज”ने जगातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून घोषित केले. या भारतीय खेळाडूने क्रीडा जगतात सर्वोच्च स्थान मिळवत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे.
नीरज चोप्राचा हा नव्या आयुष्याचा प्रवास सुखद आणि यशस्वी होवो, अशी शुभेच्छा देशभरातून दिली जात आहे.