मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या खुमासदार आणि रोखठोक शैलीत भाजपाच्या नेत्यांवर ताशेरे ओढले. वरळी येथे झालेल्या मनसेच्या मेळाव्यात त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर शंका उपस्थित केली आणि भाजपाच्या नेत्यांच्या भेटीगाठींवर मिश्कील टिप्पणी केली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “या निवडणुकीत असे काही निकाल लागलेत की निवडून आलेल्यांनाही विश्वास बसत नाही. रोज रात्री ते आपल्या पत्नीला सांगतात – ‘चिमटा काढ, खरंच मी निवडून आलोय का?’ काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सात वेळा ७०-८० हजार मताधिक्याने निवडून आले, आणि यावेळी १० हजार मतांनी पराभूत झाले. हे शक्य आहे का?”
भाजपाच्या नेत्यांसोबतच्या भेटीगाठींवर भाष्य करताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) विचारलं, “लोक म्हणतात, भाजपाच्या नेत्यांना भेटू नका. मग समोरचा म्हणाला की चहा प्यायला येतो, तर त्याला सांगायचं का – चहा कशाला प्यायचा? घरी कशाला येतोस?”
चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच्या एका भेटीचा किस्सा सांगताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मिश्कील शैलीत म्हटलं, “चंद्रकांत पाटील मुंबईत आले, चर्चा झाली, चहा-पाणी झालं आणि ते बाहेर पडले. पत्रकारांनी विचारलं, ‘भेटीत काय झालं?’ तेव्हा त्यांनी खांदा उंच करून शक्ती दाखवल्यासारखी कृती केली. ती त्यांनी का केली? मला आजही कळलेलं नाही!”
पत्रकारांच्या अंदाजांवर टीका करताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “कोणीही एकत्र भेटले की लगेच लफडं असलं पाहिजे का? बाई आणि बुवा भेटले की लगेच काहीतरी सुरू आहे, असं गृहीत धरण्याची पत्रकारांना सवय लागली आहे. राजकारणात पूर्वी सगळे एकमेकांना भेटत होते, तडजोड होत नव्हती. आत्ताही तसं नाही.”
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) स्पष्ट केलं की, कुणीही भेटायला आले तरी त्यांचा पक्षप्रेम आणि धोरणाशी कुठलाही तडजोड होणार नाही. “भेटीगाठी होत राहतील, पण माझा मराठी बाणा बोथट होणार नाही!” असं म्हणत त्यांनी आपली भूमिका ठाम असल्याचं दाखवून दिलं.