दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक– उत्तर महाराष्ट्रातील हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात रुग्ण व त्याच्या मुलाने डॉक्टरांना मारहाण केली आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सेविका आणि वॉर्डबॉय यांनी काम बंद आंदोलन सुरू केले.
रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या माहितीप्रमाणे, अपघात विभागात दाखल असलेल्या रुग्णास एक्स रे काढण्यासाठी सांगितले गेले. त्यावेळी, रुग्णाच्या मुलाने परिचारिका हिरा गांगुर्डे आणि सेविका श्रीमती धुमाळ यांना जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, डॉक्टर डॉ. जितेंद्र धनेश्वर यांना धक्काबुक्की केली आणि अपघात विभागाची तोडफोड केली.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ आयोजित आंदोलनामुळे बाह्यरुग्ण तपासणीसाठी आलेले रुग्णांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. आंदोलकांनी पोलिस चौकीची तात्काळ मागणी केली आणि हल्लेखोरांना कडक शासनाची विनंती केली.
आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण आणि माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुकदेव काळे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्ण व त्याच्या मुलास ताब्यात घेतले.
सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवला गेला आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर रुग्णालय परिसरात पोलीस चौकी देण्याचे आश्वासन आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिले. याशिवाय, डॉक्टरांनी आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, गणेशोत्सवानंतर पोलीस चौकीची सुविधा उपलब्ध झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.