नाशिक : शहरात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने एक मोठी कारवाई करत मोबाईल जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १८ महागडे मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, चोरीचे मोबाईल खपवणाऱ्या टोळीतील ४ आरोपींना अटक करण्यात आले आहे. या मुद्देमालाची एकूण किंमत ४,२०,००० रुपये इतकी आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, तसेच सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांनी शहरातील मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सातपूर परिसरात तपास सुरू केला असता, दोन इसम चोरीचे मोबाईल विकण्यासाठी सातपूरच्या राधाकृष्णनगर येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे आणि पोउनि मुक्तारखान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून रामनिवास सुंदरलाल निशाद (वय ३८, रा. कांबेगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे)
अजय अनिल देवकर (वय ३०, रा. जी.पी. नगर, सातपूर, नाशिक) या संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
या झडतीत ९०,००० रुपये किमतीचे ५ मोबाईल जप्त करण्यात आले. तपासादरम्यान त्यांनी प्रेम मिलींद गिते नावाच्या इसमाकडून चोरीचे मोबाईल विकत घेतल्याची कबुली दिली.
यानंतर पोलिसांनी अजय देवकरच्या घराची झडती घेतली असता, तब्बल २,४५,००० रुपये किमतीचे १२ मोबाईल जप्त करण्यात आले. मुख्य सूत्रधार प्रेम गिते याला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून सातपूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडून ८५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.प्रेम गितेने कबुली दिली की, त्याने आपल्या साथीदारांसोबत सातपूर एमआयडीसी परिसरात अनेक ठिकाणी मोबाईल चोरण्याचे गुन्हे केले आहेत. त्याचे साथीदार हर्षल नितीन पाटील आणि भाऊसाहेब गोसावी यांच्यासोबत मिळून त्यांनी शहरभर मोबाईल चोरी केल्याचे उघड झाले,पोलिसांनी हर्षल नितीन पाटीलचा शोध घेऊन त्याला आयटीआय सिग्नल, सातपूर येथून अटक केली.एकूण मुद्देमाल :महागडे १८ मोबाईल – ३,२०,०००/- रुपये,मोटारसायकल – १,००,०००/- रुपये,एकूण किंमत : ४,२०,०००/- रुपये हस्तगत करण्यात आला आहे
याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही महत्त्वाची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ ने केली. या पथकात,सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे,पोउनि मुक्तारखान पठाण, सपोनि गुलाब सोनार, पोहवा चंद्रकांत गवळी, चापोहवा अतुल पाटील, पोअं महेश खांडबहाले, तेजस मते यांचा समावेश होता.
या कारवाईमुळे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून, यामुळे शहरातील मोबाईल चोरीच्या घटनांना आळा बसेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.