नाशिकरोड (Nashik Politics) : आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आता जोमाने कामाला लागण्याचे आवाहन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले. नाशिक महापालिकेत शिवसेनेचा महापौर व्हावा, यासाठी एकसंघ प्रयत्नांची गरज असल्याचे ते म्हणाले.
पदाधिकारी मेळाव्यात निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा
Nashik Politics – नाशिकरोडमधील समाज मंदिर डावखरवाडी (प्रभाग २०) आणि जैन भवन (प्रभाग २१) येथे आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार वाजे यांच्यासह उपनेते सुनील बागूल, दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते, कोअर कमिटी सदस्य केशव पोरजे, भारती ताजनपुरे, अस्लम मणियार, मसूद जिलानी, जयंत गाडेकर, किरण डहाळे, सुधाकर जाधव आणि महेश बडवे यांची उपस्थिती होती.
शिस्तबद्ध इच्छुक आणि गुन्हेगारीविरोधात मोहिम
उपनेते दत्ता गायकवाड यांनी स्पष्ट केले की, महापालिका निवडणुका आठ वर्षांनंतर होत असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. काहींना थांबवावे लागेल, पण सर्वांच्या अपेक्षा योग्य प्रकारे हाताळल्या जातील. शिवाय, प्रत्येक प्रभागात गुन्हेगारीविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली जाईल आणि या संदर्भात पोलीस महासंचालक व राष्ट्रपतींना निवेदन सादर केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
शिवसेना एकसंघ, लक्ष्य महापौर पद
प्रत्येक शिवसैनिकाने मैदानात उतरून नागरिकांच्या मनात शिवसेनेबद्दल विश्वास निर्माण करावा आणि नाशिक महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन राजाभाऊ वाजे यांनी केले. सुनील बागूल आणि डी. जी. सूर्यवंशी यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.