Nashik Politics | विलास शिंदेंनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट; चर्चा तर होणारच

mbcMarathiNashik Politics |

शिंदे यांनी शिंदे यांची धावती भेट अन् आशीर्वाद घेतल्याने एकच चर्चा रंगली

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Nashik Politics : येथील ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आठवडाभरात दुसऱ्यांदा भेट झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. मागील सोमवारी (दि.२) विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हजेरी लावत ठाकरेंच्या सेनेत अस्वस्थता निर्माण केली होती. त्यानंतर रविवारी (दि. ५) विवाह सोहळ्यानिमित्तच नाशिक दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांची विलास शिंदे यांनी धावती भेट अन् आशीर्वाद घेतल्याने एकच चर्चा रंगली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला मोठे हादरे बसताना दिसून येत आहे. मागील सोमवारी ठाकरे सेनेचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावत ठाकरे सेनेला हादरा देण्याचे संकेत दिले होते. मंत्री महाजन यांनी तर उघडपणे आठवडाभरात ठाकरे सेनेत मोठा भूकंप होणार असल्याचे विधान केले होते. त्यातच ठाकरे सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच माध्यमांमध्ये पक्षाविषयी उघडपणे नाराजी बोलून दाखविली होती. तसेच महानगरप्रमुख विलास शिंदे पक्षात नाराज असल्याचेही म्हटले होते. दरम्यान, बडगुजर यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगत असतानाच, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या प्रवेशाला एकप्रकारे ग्रीन सिग्नल दिला होता

दरम्यान, बडगुजर यांच्यापाठोपाठ विलास शिंदे हेदेखील ठाकरे सेनेची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगत असतानाच, रविवारी (दि. ८) त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धावती भेट घेत, आशीर्वाद घेतल्याने चर्चेला बळकटी मिळताना दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री गंगापूर गावमार्गे विवाह सोहळ्याला जात असताना, विलास शिंदे यांनी त्यांची धावती भेट घेत, आशीर्वाद घेतले. दरम्यान, कौटुंबिक संबंधांमुळे उपमुख्यमंत्री शिंदे विवाह सोहळ्यास आले होते, असा खुलासा विलास शिंदे यांनी त्यावेळी केला होता. धावत्या भेटीबाबत मात्र, त्यांनी आभाराचे कारण दिले असले तरी, राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगत आहे.

ते भेटले यात प्रॉब्लेम काय? – उपमुख्यमंत्री शिंदे

विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नात गेलो होतो. त्यामुळे ते मला भेटले, यात प्रॉब्लेम काय? अशी थेट प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. माध्यम प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी विलास शिंदे हे जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी भेट घेतली. त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. त्यात प्रॉब्लेम काय आहे. मी लग्नाला आलो आहे, तुम्ही त्याचा राजकीय अर्थ काढू नका. विलास शिंदे त्यांच्या पक्षात नाराज आहेत की नाही, हे मला माहीत नाही. तुम्ही त्यांनाच विचारा, असे ते म्हणाले. सुधाकर बडगुजर यांच्याविषयी विचारले असता, ‘तो विषय मला माहीत नाही’ असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

अजय बोरस्ते यांच्या पुतणीच्या लग्नाला पण उपस्थित होतो. त्याठिकाणी जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले, तेव्हा ते माझ्या कन्येच्या लग्नाला आले होते म्हणून मी त्यांचे आभार मानण्यासाठी गेलो होतो. आभार मानणे आपले संस्कार आणि संस्कृती आहे. वास्तविक, त्यांचा मोबाइल नंबरही माझ्याकडे नाही. योगायोगाने ही भेट झाली. कोणीही चुकीचा अर्थ काढू नये.