Nashik Simhastha Kumbh Mela 2027 | सिंहस्थासाठी 25 हजार पोलिसांचा मजबूत बंदोबस्त – पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची माहिती

Nashik Simhastha Kumbh Mela 2027 | 25 thousand police personnel deployed for Simhastha – Information from Police Commissioner Sandeep Karnik

नाशिक | Nashik Simhastha Kumbh Mela 2027 – येत्या 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २५ हजार पोलिसांचा फौजफाटा सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक सिंहस्थासाठी व्यापक पोलीस आराखडा तयार

Nashik Simhastha Kumbh Mela 2027 – सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून कोट्यवधी भाविक आणि साधू-संत येणार असल्यामुळे शहराची कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि सुरक्षेचा प्रभावी बंदोबस्त करणे गरजेचे आहे. या दृष्टीने ३ हजार स्थानिक पोलिसांसह २२ हजार अतिरिक्त पोलिसांची तैनाती केली जाईल, असेही कर्णिक यांनी स्पष्ट केले.

शहरातील वाहतूक आणि अतिक्रमणांवर विशेष भर

शहरात सध्या वाढत असलेली वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांचे प्रश्न सुटावेत यासाठी शासकीय यंत्रणांबरोबरच लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे कर्णिक यांनी नमूद केले. द्वारका चौक वाहतूक सुधारणा यासाठी मंत्री छगन भुजबळ आणि आमदार देवयानी फरांदे यांनी घेतलेला पुढाकार सरकारच्या योजनांना बळ देणारा ठरत आहे.

पार्किंग झोन्स, ट्रॅफिक वॉर्डन्स आणि कठोर दंडात्मक कारवाई

पश्चिम विभागात प्रायोगिक तत्त्वावर पार्किंग झोन्स सुरू करण्यात आले असून, नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. याचा यशस्वी अनुभव आल्यास संपूर्ण नाशिक शहरात योजना राबवली जाईल. तसेच, वाहतुकीच्या शिस्तीसाठी ट्रॅफिक वॉर्डन्स नेमण्याचे नियोजनही सुरू आहे.

अल्पवयीन गुन्हेगारी थोपवण्यासाठी म्होरक्यांवर कारवाई

शहरात अलिकडे अल्पवयीन गुन्हेगारांच्या संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या गुन्ह्यांमागे अल्पवयीनांना फसवून गुन्ह्यांकडे प्रवृत्त करणारे म्होरके असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा मुख्य सूत्रधारांवर थेट गुन्हे दाखल करण्याची रणनीती आखण्यात आल्याचे आयुक्त कर्णिक यांनी सांगितले.