नाशिक / निफाड – Nashik Accident News नाशिक-संभाजीनगर महामार्गावरील नागापूर फाटा (ता. निफाड) येथे भरधाव डंपरने चिरडल्याने सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी चांदोरी-निफाड मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. यामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तासांहून अधिक काळ ठप्प झाली होती.
मृत विद्यार्थिनीचे नाव सिद्धी मंगेश लुंगसे (वय 12, रा. चांदोरी) असे आहे. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि. ३० जून) सकाळी १० वाजता घडली.
अपघाताचा धक्कादायक प्रकार- (Nashik Accident News)
सिद्धी लुंगसे ही न्यू इंग्लिश स्कूल, चांदोरी येथे सायकलवरून जात होती. नागापूर फाटा येथे रस्ता ओलांडत असताना नाशिककडून निफाडकडे भरधाव जाणाऱ्या डंपर (MH JW 4446) ने तिला जोरदार धडक दिली. धडकेमुळे ती दूरवर फेकली गेली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला.
त्याच डंपरने पुढे जाऊन एक दुचाकीस्वार दाम्पत्यालाही धडक दिली. यात विश्वनाथ जाधव (५५) आणि पत्नी पद्मा जाधव (४९) हे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी राख आढळल्याने संबंधित डंपर राख वाहतूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संतप्त ग्रामस्थांचा रस्ता रोको
दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चांदोरी-निफाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत डंपर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. यामुळे महामार्गावर २ ते २.५ किलोमीटरपर्यंत वाहने अडकून पडली.
पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश पालवे, पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, सायखेडा पीआय विकास ढोकरे, तहसील व महसूल अधिकारी आदींनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांना आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
- डंपर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
- शाळा परिसरात गतिरोधक व झेब्रा क्रॉसिंगची गरज
- महामार्गावर स्पीड कंट्रोलसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी
- वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी
- RTO व पोलिसांनी स्थानिक नागरिकांची अडचण लक्षात घ्यावी
अपघातानंतर गुन्हा दाखल
या प्रकरणी सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिस व प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.