Nashik Crime News | नाशिकमध्ये साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; 1 जण अटकेत

Nashik Crime News | Gutkha worth Rs 3.5 lakh seized in Nashik; 1 person arreste

नाशिक (Nashik Crime News) – नासर्डी पुलाजवळील आंबेडकरवाडी येथे राज्यात विक्रीसाठी बंदी असलेला सुगंधित पानमसाला आणि गुटख्याचा अवैध साठा अन्न, औषध प्रशासन व उपनगर पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत अंदाजे ₹३ लाख ४९ हजार किमतीचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा देवीदास महाजन यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी छापा टाकला. शशिकांत पवार यांनी गोदामासाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या खोलीत संशयित मोहम्मद फिरोज सिद्दिकी (३४, रा. नानावली) मालवाहतूक वाहनासह सापडला. मात्र, वाहनचालक रेहान इम्तियाज खान पठाण (३६, रा. वडाळागाव) घटनास्थळावरून पसार झाला.

Nashik Crime News

तपासादरम्यान सिद्दिकीने, खोली पवार यांच्याकडून ₹३,००० मासिक भाडे देऊन घेतल्याचे सांगितले. खोली आणि मालवाहतूक वाहनाची तपासणी करताना मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला. महाजन यांच्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३७/२०२५ अंतर्गत सिद्दिकी व खान-पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.