Smart Parking Nashik : स्मार्ट पार्किंग योजनेला गती, निविदा उघडणार – पार्किंगचे दर जाहीर

Smart Parking Nashik: Smart parking scheme gains momentum, tenders to be opened – parking rates announced

नाशिक | Smart Parking Nashik
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू होणाऱ्या स्मार्ट पार्किंग योजनेला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. विधी विभागाच्या मान्यतेनंतर नाशिक महापालिकेने निविदा उघडण्याची तयारी सुरू केली असून ऑन-स्ट्रीट आणि ऑफ-स्ट्रीट पार्किंगसाठीचे दरही निश्चित करण्यात आले आहेत.

दुचाकीसाठी ₹10 ते ₹60 प्रतितास, तर चारचाकीसाठी ₹20 ते ₹100 प्रतितास इतके दर ठरवले गेले आहेत. अनधिकृत पार्किंग केल्यास टोईंगसाठी आता मोठा दंड आकारला जाणार असून, दुचाकीसाठी ₹700 आणि चारचाकीसाठी ₹1150 द्यावे लागतील.

नाशिकमधील पार्किंग समस्येवर तोडगा

नाशिकमध्ये वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी माजी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत २९ ऑन-स्ट्रीट व ५ ऑफ-स्ट्रीट अशा एकूण ३४ पार्किंग स्पॉट्स मंजूर केले होते. मात्र, कोविड-१९ काळात ही योजना अयशस्वी ठरली. सध्याच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी हा प्रकल्प पुन्हा रुळावर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

आता शहरातील २८ ठिकाणी एकाच वेळी ४,८६५ वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. स्मार्ट पार्किंग निविदा प्रक्रियेवर आलेली न्यायालयीन स्थगिती हटविल्यानंतर महापालिकेने योजनेला गती दिली आहे.

महापालिका व पोलिसांना महसूल वाढ

या योजनेतून महापालिकेला दरमहा सुमारे ₹35 लाखांचा महसूल ठेकेदाराकडून मिळणार आहे. पोलिसांना टोइंगमधून ठराविक रक्कम मिळेल. शिवाय, शासकीय दरानुसार टोइंग शुल्क वाढवले गेले आहे.

मुख्य वैशिष्ट्ये (Smart Parking Nashik)

  • स्मार्ट पार्किंग व्यवस्थापन – ऑनलाईन पेमेंट, डिजिटल रिसीट
  • शहरातील प्रमुख चौक व गर्दीच्या भागांवर लक्ष केंद्रित
  • वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शिस्तबद्ध पार्किंग