दारू विक्रीवर १००% बंदीसाठी ग्रामपंचायतीचा निर्धार
देवळा बातमी (Vajgaon Desi Liquor Ban) – वाजगाव-वडाळे ग्रुप ग्रामपंचायत मारुती मंदिर येथे, सरपंच सिंधुबाई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत गावात अवैध देशी दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या बैठकीत गावातील सामाजिक आणि विकासात्मक मुद्द्यांवर देखील चर्चा झाली.
ग्रामसभेतील प्रमुख निर्णय
- दारूबंदीचा ठराव – सुनील देवरे यांच्या सूचनेनुसार गावात देशी दारू विक्रीवर १००% बंदी आणण्याचा ठराव मंजूर.
- थकबाकी वसुली धोरण – ग्रामपंचायतीची ₹२० लाख नळपट्टी आणि घरपट्टी थकीत असून, थकबाकीदारांची यादी सार्वजनिक करून, त्यांना कोणतेही दाखले न देण्याचा निर्णय.
- ग्रामसभेतील सहभागावर निर्बंध – थकबाकीदारांना ग्रामसभेत मत मांडण्यास मनाई.
- अवैध हातभट्ट्यांवर कारवाई – गावातील सर्व हातभट्ट्या पूर्णपणे बंद झाल्याची माहिती अध्यक्ष संजय देवरे यांनी दिली.
इतर महत्त्वाच्या चर्चा
- आरोग्यविषयक योजना – डॉ. प्रीतम आहेर यांनी आयुष्मान भारत आणि वय वंदना योजना यांची माहिती दिली.
- शेती मार्गदर्शन – तलाठी महेश पवार यांनी अॅपद्वारे पिक पाहणी प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
- शाळा विकास – वडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची रंगरंगोटी व दुरुस्ती करण्याची मागणी प्रदीप सोनवणे यांनी केली.
- शेतवस्ती नोंदणी – ग्रामसेविका नूतन देवरे यांनी ग्रामपंचायतीकडे नोंद न झालेल्या घरांची नोंदणी करण्याचे आवाहन केले.
दारूबंदी समितीचे आवाहन
ग्रामस्थांनी दारूबंदी यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन दारूबंदी समितीच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार शुभानंद देवरे यांनी मानले.
ग्रामसभेला उपस्थित मान्यवर (Vajgaon Desi Liquor Ban)
उपसरपंच सुनील देवरे, पोलिसपाटील नीशा देवरे, तुषार देवरे, प्रभाकर देवरे, गिरीश आहेर, डॉ. प्रीतम आहेर, आरोग्यसेवक अशोक जाधव, मीनाक्षी वाघ, प्रमिला मगर, ज्योती आहेर, रंजना देवरे, ज्योती केदारे, एकनाथ खैरनार, समाधान केदारे यांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.