नाशिक: शहरात तिहेरी आत्महत्येची धक्कादायक घटना, पाथर्डी फाटा परिसरात वडील, आई आणि मुलीने संपवले जीवन

nashik madhye toheri aatmhatyecha dakkadayak prakar

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक, १८ सप्टेंबर: पाथर्डी फाटा परिसरातील सराफ नगर भागात आज सकाळी तिहेरी आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खाजगी कंपनीत काम करणारे विजय सहाने (३६), त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी सहाने (३२) आणि त्यांची ९ वर्षांची मुलगी अनन्य सहाने यांनी एकत्र आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ही घटना सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान उघडकीस आली. सहाने कुटुंब मूळचे गौवळाणे गावातील असून, सध्या पाथर्डी परिसरात प्रतिगंगा रो-हाऊसमध्ये विजयचे आजोबा माणिक आणि आजी लिलाबाई यांच्या समवेत राहत होते. नेहमीप्रमाणे अनन्य शाळेत जाण्यासाठी खाली आली नसल्याने आजोबा माणिक वरच्या मजल्यावर जाऊन पाहण्यास गेले. मात्र दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने माणिक यांनी शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले.

परिसरातील एक दूधवाला दरवाजा तोडून घरात शिरला आणि तिघेही मृत अवस्थेत आढळले. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, विजय आणि ज्ञानेश्वरी यांनी आधी मुलीला विष पाजले आणि नंतर पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.

विशेष म्हणजे, या दाम्पत्याने आत्महत्येच्या एक दिवस आधी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन घेतले होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, या कुटुंबाने असा टोकाचा निर्णय का घेतला याचा शोध घेण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply