नाशिकरोड | प्रतिनिधी
Breaking News : नाशिकरोड परिसरात जुन्या वादातून एका २१ वर्षीय तरुणावर दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पहिला हल्ला वस्तीत झाल्यानंतर उपचारासाठी दाखल असताना आरोपींनी थेट बिटको रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात घुसून पुन्हा कोयत्याने वार केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक अनिल गांगुर्डे (वय २१) हा तरुण रोकडोबावाडी, देवळालीगाव येथे आपल्या मामेभावाकडे राहून मजुरीचे काम करतो. वर्षभरापूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून आरोपींनी हा हल्ला केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
बुधवारी सायंकाळी सुमारे ५:३० वाजण्याच्या सुमारास दीपक रिक्षा पाहण्यासाठी थांबला असताना दीपक चटोले, सनी चटोले आणि संदीप चटोले यांनी त्याला गाठले. “तुला जिवंत सोडत नाही” अशी धमकी देत आरोपींनी घरातून कोयते आणून त्याच्या डोक्यावर गंभीर वार केले. या हल्ल्यात दीपक गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला.
यानंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र आरोपींचा संताप यानंतरही शांत झाला नाही. रात्री सुमारे ९:३० वाजता, दीपक रुग्णालयातील बेडवर उपचार घेत असताना संदीप चटोले हातात कोयता घेऊन थेट आपत्कालीन विभागात शिरला आणि त्याच्या मानेखाली वार करून पुन्हा गंभीर जखमी केले.
कर्मचाऱ्यांचे धाडस, मोठी दुर्घटना टळली
रुग्णालयात हल्ला सुरू असताना तेथे उपस्थित असलेले सफाई कामगार राम निवृत्ती शिंदे, सुरक्षा रक्षक दीपक भोसले, मायकल निकाळजे आणि परिचारिका कावेरी नेहे यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली.
कर्मचाऱ्यांनी आरडाओरड करत प्रतिकार केल्याने संशयित तेथून पसार झाले.
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्यादीच्या तक्रारीनुसार दीपक चटोले, सनी चटोले आणि संदीप चटोले यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माळी आणि हवालदार गायकवाड करत आहेत.