Stock Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात करत गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवला. सोमवारी बाजार उघडताच निफ्टीने (Nifty) 220 अंकांची उसळी घेत 23,940 वर ओपनिंग केली, तर सेन्सेक्समध्येही मजबूत वाढ पाहायला मिळाली. जागतिक पातळीवरील सकारात्मक घडामोडींमुळे बाजाराचा मूड उत्साहवर्धक दिसून आला.
विशेषतः कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेली घसरण आणि इराण-अमेरिका चर्चेबाबत समोर आलेल्या सकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने भारतीय रुपयालाही आधार मिळाला असून, डॉलरच्या तुलनेत रुपया 35 पैशांनी मजबूत होत 95.34 वर उघडला.
मागील आठवड्यात IT क्षेत्राची दमदार कामगिरी
गेल्या आठवड्यात बाजारात संमिश्र वातावरण असले तरी काही क्षेत्रांनी उत्कृष्ट कामगिरी केली. निफ्टी 0.3 टक्क्यांच्या वाढीसह 23,719 वर बंद झाला होता. मिडकॅप निर्देशांकात 1.1 टक्क्यांची तेजी दिसली, तर स्मॉलकॅप निर्देशांक जवळपास स्थिर राहिला.
सेक्टोरल इंडेक्समध्ये IT क्षेत्र सर्वाधिक चमकलं. IT इंडेक्समध्ये तब्बल 4.1 टक्क्यांची वाढ झाली. त्याशिवाय रिअल्टी आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रातही खरेदीचा जोर दिसून आला. मात्र FMCG क्षेत्रात 1.5 टक्क्यांची घसरण झाली. PSU आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातही काही प्रमाणात कमजोरी दिसली.
Grasim ठरला टॉप गेनर (Nifty)
निफ्टीमधील (Nifty) प्रमुख शेअर्समध्ये Grasim Industries हा सर्वात मोठा गेनर ठरला. या शेअरमध्ये 7.5 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. याशिवाय Wipro, Infosys आणि Trent यांनीही चांगली कामगिरी केली.
दुसरीकडे Power Grid हा सर्वात मोठा लूजर ठरला. या शेअरमध्ये 3.8 टक्क्यांची घसरण झाली. Tata Steel आणि Tata Consumer यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली.
बाजाराची पुढील दिशा कशावर ठरणार?
मार्केट एक्स्पर्ट्सच्या मते, Q4 निकालांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, पुढील काही दिवस बाजाराची दिशा जागतिक आर्थिक आणि राजकीय घडामोडींवर अवलंबून राहणार आहे.
विशेषतः इराण-अमेरिका चर्चा, स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील परिस्थिती, कच्च्या तेलाचे दर, बॉण्ड यिल्डमधील बदल आणि रुपयाची हालचाल यावर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.
तांत्रिक विश्लेषणानुसार, 23,850 ते 23,900 हा निफ्टीसाठी महत्त्वाचा रेसिस्टन्स झोन मानला जात आहे. तर 23,400 ते 23,350 हा सपोर्ट झोन असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
कच्च्या तेलाच्या घसरणीचा सकारात्मक परिणाम
स्ट्रेट ऑफ होर्मुजबाबत सकारात्मक संकेत मिळाल्याने कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलरच्या खाली आल्या आहेत. यामुळे भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी भारत आणि पंतप्रधान Narendra Modi यांच्याबाबत केलेल्या सकारात्मक वक्तव्यामुळेही बाजारातील भावना मजबूत झाल्या आहेत.
एकूणच, आठवड्याची सुरुवात भारतीय शेअर बाजारासाठी उत्साहवर्धक ठरली असून, आगामी काही दिवस जागतिक घडामोडींवर बाजाराची दिशा अवलंबून राहणार आहे.