नाशिकरोड | प्रतिनिधी
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील (NashikRoad Central Jail) तीन अधिकाऱ्यांचा एका संशयित आरोपीसोबत कथित दारू पार्टी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार कारागृहाच्या आवारातील अधिकारी निवासस्थानाबाहेरच घडल्याचा दावा करण्यात येत असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तीन जण एका पार्टीत सहभागी झाल्याचे दिसत असून, रात्रीच्या वेळी मद्यपान सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. संबंधित व्यक्तींपैकी एक जण फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक होऊन जामिनावर बाहेर आलेला संशयित असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
यापूर्वीदेखील नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील काही अधिकारी विविध कारणांमुळे चर्चेत आले होते. मुंबई बॉम्बस्फोटासह अनेक गंभीर गुन्ह्यांतील आरोपी या कारागृहात शिक्षा भोगत असताना, त्याच कारागृहातील अधिकाऱ्यांचा एका संशयित आरोपीसोबत पार्टी करतानाचा व्हिडीओ समोर आल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी फसवणुकीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेला एक संशयित जामिनावर मुक्त झाला होता. रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तोच संशयित कारागृहातील तीन अधिकाऱ्यांसोबत बसून मद्यपान करताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, ही पार्टी कारागृहाच्या शासकीय निवासस्थान परिसरातच झाल्याचे बोलले जात असल्याने संबंधित अधिकारी आणि संशयित यांच्यातील संबंधांबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, या प्रकरणी कारागृह प्रशासनाची अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने प्रशासनाकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती.