Nashik Police : नाशिकरोड आणि पिंपरी-चिंचवडमधील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला नाशिकरोड गुन्हेशोध पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून तब्बल ३५ लाख रुपये किमतीचे २३ तोळे सोन्याचे दागिने आणि १ तोळा सोन्याची लगड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सचिन भगवान सहजराव (२५, रा. ताथवाडे, नवले वस्ती, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
Nashik Police पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ २) किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याला भेट देऊन सराफ बाजार व संवेदनशील भागात विशेष गस्त घालत व्यापारी आणि नागरिकांशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, अतुल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवादार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव अरुण गाडेकर , महिला पोलीस हवालदार संध्या कांबळे, रोहित शिंदे आणि योगेश रानडे हे देवी चौक सराफ बाजार परिसरात गस्त घालत होते. याच दरम्यान, एक संशयित इसम चोरीचे सोने विक्री करण्यासाठी देवी चौकात येणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पथकाला मिळाली. माहिती मिळताच पथकाने क्षणाचाही विलंब न लावता सापळा रचून संशयित सचिन सहजराव याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी संशयिताची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे २३ तोळे सोन्याचे दागिने आणि १ तोळ्याची सोन्याची लगड आढळून आली. या मालाची किंमत सुमारे ३५ लाख रुपये आहे. अधिक चौकशी केली असता, हा मुद्देमाल नाशिकरोड पोलीस ठाण्यातील आणि पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वाकड पोलीस ठाण्यातील मधील घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही गुन्हे दाखल आहेत.
ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त किशोर काळे, सहाय्यक डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोनि बडेसाब नाईकवाडे, अतुल चौधरी, सपोनि प्रवीण सूर्यवंशी तसेच गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवादार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, महिला पोलीस हवालदार संध्या कांबळे, पोलीस शिपाई अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सागर आडणे करत आहेत.