नाशिक: भावाच्या घरात घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या महिलेला तिच्या साथीदारासह गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात १.९१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आशापुरा हौसिंग सोसायटीत फिर्यादीच्या घरातून सोन्याचे दागिने आणि ६० हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त प्रशांत बच्छाव आणि सहायक आयुक्त संदीप मितके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट क्र. १ पथकाने तपास सुरू केला.
गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, चोरीतील संशयित महिला रासबिहारी रोडवरील साईश्रद्धा पेट्रोल पंपाजवळ आहे. तत्काळ पथकाने घटनास्थळी जाऊन तिला अटक केली. चौकशी दरम्यान, ती फिर्यादीची बहिण असल्याचे उघड झाले. तिने तिच्या साथीदार रिक्षाचालक रवि रमेश जोगदंड याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.
सहकारी आरोपी रवि जोगदंडला उपनगर बसस्थानकातून अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान, चोरीतील सोन्याचे दागिने त्यांनी कल्याण येथे विकल्याचे आणि त्यातून मिळालेली रोख रक्कम १.९१ लाख रुपये घरात लपवून ठेवली असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष रोख रक्कम हस्तगत केली.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक मधुकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रशांत मरकड, विशाल देवरे, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, महिला पोलीस शारदा कोकणे, अनुजा येलवे, आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.
सदर आरोपींना मुद्देमालासह म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील कारवाई सुरू आहे.