मुंबई: महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी अलिबाग-विरार कॉरिडॉर प्रकल्पाला अर्थमंत्री अजित पवार उर्फ ‘दादा’ यांनी मोठा झटका दिला आहे. त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी नाकारल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रकल्पाच्या मंजुरीवरून चांगलाच गदारोळ झाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रकल्पाची तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी केली असताना, अर्थमंत्री पवार यांनी हा निर्णय पुढे ढकलण्याचा ठाम निर्णय घेतला. यामुळे शिंदे यांच्यात नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत आक्रमक पवित्रा घेत अर्थमंत्र्यांना टोला लगावत म्हटले की, “अर्थखात्याने जर मंजुरी दिली नाही, तर मुख्यमंत्री पदाच्या अधिकारांतर्गत हा प्रकल्प मंजूर करू.” शिंदे यांचा हा रोखठोक सूर ऐकून दादा तात्काळ नाराज झाले. बैठकीतून बाहेर पडल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे.
शिंदे सरकारच्या मुख्य प्रकल्पांपैकी एक असलेला हा कॉरिडॉर प्रकल्प राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, अर्थमंत्र्यांच्या निर्णयामुळे हे प्रकरण आता राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आले आहे.
या प्रकल्पाच्या संदर्भात सरकारमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले आहेत. शिंदे सरकारची प्रतिष्ठा पणाला लागल्याने पुढील काही दिवसांत या प्रकरणावर काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.