मुंबई | Maharashtra Lightning Alert App News|
राज्यात वीज कोसळून होणाऱ्या अपघाती मृत्यू रोखण्यासाठी लवकरच आणखी अचूक व कमी परिघात सूचना देणारे नवीन मोबाईल अॅप विकसित केले जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली.
‘दामिनी’ आणि ‘सचेत’ या विद्यमान अॅप्सप्रमाणे, पण अधिक अचूक आणि सूक्ष्म मर्यादेत कार्य करणारे अॅप राज्यात विकसित होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई – वीज कोसळण्याचे वाढते प्रमाण – अचूक पूर्वसूचना गरजेची
भाजप आमदार संतोष दानवे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करताना वीज कोसळण्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री महाजन म्हणाले की, गेल्या काही वर्षांत राज्यात वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
विशेषतः शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना वीज कोसळण्याचा धोका सर्वाधिक आहे, कारण ते बाहेरच्या कामात अधिक वेळ घालवतात.
विद्यमान अॅप्स ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ कशा प्रकारे देतात सूचना?
भारतीय उष्णदेशीय हवामान संस्थेने विकसित केलेली ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ ही अॅप्स ४० किलोमीटर परिघात वीज कोसळण्याची शक्यता दर्शवून वापरकर्त्यांना तत्काळ सूचना पाठवतात.
राज्य सरकारतर्फे या अॅप्सचा ग्रामीण भागात प्रचार आणि प्रसार सुरू आहे.
वीज कोसळून मृत्यूंची आकडेवारी
- २०२२ मध्ये वीज कोसळून २३६ जणांचा मृत्यू
- २०२३ मध्ये अशाच घटनांमध्ये १८१ नागरिकांचा बळी
ही आकडेवारी पाहता, अधिक अचूक आणि स्थानिक स्तरावर परिणामकारक अॅपची आवश्यकता स्पष्ट होते.
वीज पडून मृत्यू किंवा नुकसानीवर सरकारकडून मदत:
- मृत्यू झाल्यास: कुटुंबियांना ₹४,००,०००
- गंभीर जखमी व्यक्तीस: ₹२,५०,०००
- जनावरांच्या मृत्यूवर मदत:
- गाय/म्हैस/बैल – ₹३७,५००
- मेंढी/शेळी – ₹४,०००
२०१७ नंतर लागू झालेल्या निकषांनुसार ही मदत दिली जाते. मंत्री महाजन यांनी या मदतीत वाढ करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचेही स्पष्ट केले.