डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘विश्वरत्न सार्वजनिक जयंती उत्सव समिती’ची अनोखी संकल्पना
Bhim Janmabhoomi Nashik : नाशिकरोड | प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिकरोड येथे ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती’च्या वतीने भव्य ‘भीम जन्मभूमी’चा देखावा उभारण्यात आला आहे. महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचे प्रतिकात्मक दर्शन घडवणारा हा देखावा ११ एप्रिल रोजी सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
प्रकाश लोंढे आणि अशोक गिरी यांच्या हस्ते उद्घाटन
सदर देखाव्याचे उद्घाटन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि नाशिकरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी समितीचे अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे, कार्याध्यक्ष मनोहर जाधव, सरचिटणीस राहुल पगारे, खजिनदार विजय पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
देखाव्याचे वैशिष्ट्ये: ४५ फूट उंच आणि ३२x३२ फूट परिघ
सुनील समजीसकर यांची संकल्पना आणि दिग्दर्शन
हा देखावा सुमारे ३२ बाय ३२ फूटाच्या परिघात असून, त्याची उंची तब्बल ४५ फूट आहे. या देखाव्याचे संपूर्ण संकल्पनाकार आणि दिग्दर्शक म्हणून मुंबईचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुनील समजीसकर यांनी हे कार्य पार पाडले आहे.
महूची ऐतिहासिक वास्तू नाशिकमध्येच
या देखाव्यामुळे नाशिककरांना मध्य प्रदेशातील महू येथील ऐतिहासिक वास्तूचे दर्शन स्थानिक स्तरावरच घेता येत असून, नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे. जयंतीच्या पार्श्वभूमीवर या देखाव्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि आंबेडकरी अनुयायांनी याठिकाणी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.