नाशिकच्या रस्त्यांवरून न्यायाच्या मागणीचा आवाज : आरोपींना फाशी देण्याची मागणी
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Bodhale Nagar murder case | काही दिवसांपूर्वी नाशिकच्या बोधले नगर येथे दोन सख्ख्या भावांचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण शहर हादरून गेलं असून, समाजातील विविध घटकांनी या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला आहे.
पाच संशयित अटकेत, पण अजूनही प्रश्न अनुत्तरित (Bodhale Nagar murder case)
घटनेनंतर नाशिक पोलिसांनी तत्परता दाखवत पाच संशयितांना अटक केली होती. मात्र, आंबेडकरी समाजाने पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, हा प्रकार केवळ टोळक्यांतील वर्चस्व वादाचा नसून, यामागे आणखी गंभीर कारणे दडलेली आहेत. खुनामध्ये सामील असलेले आरोपी पाचपेक्षा अधिक असावेत, अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
CBI चौकशीची मागणी, पोलीस आयुक्तांना निवेदन
या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, आणि सीबीआयमार्फत तपास करण्यात यावा, यासाठी आंबेडकरी समाज तसेच मृतकांचा जाधव परिवाराने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे. पोलिसांनी या मागणीची गंभीर दखल घेत ही केस गुन्हे शाखेकडे सुपूर्द केली आहे.
भीमसैनिकांचा विराट मूक मोर्चा – बिडी भालेकर मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय
न्याय मिळवण्यासाठी नाशिकच्या बिडी भालेकर मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारो भीमसैनिकांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात समाजातील विविध घटकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. शांततेच्या मार्गाने सरकार आणि प्रशासनाच्या निदर्शनास ही घटना आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जाधव कुटुंबाला न्याय मिळावा, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी
या मूक मोर्चाचा मुख्य उद्देश होता – जाधव कुटुंबाला न्याय मिळवून देणे आणि दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी जोरदारपणे पुढे मांडणे. “खरे आरोपी समोर यावेत आणि निर्दोषांना शिक्षा होऊ नये,” अशी भावना समाजातून व्यक्त केली जात आहे.