नाशिक : शहरातील विविध बस स्थानकांवर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि पर्समधील मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या ‘बंटी-बबली’ जोडीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने मंगेश अशोक राखपसरे (वय २४) व त्याची पत्नी निशा मंगेश राखपसरे (वय २५) या दाम्पत्याला देवळाली कॅम्प परिसरातून अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीचे सुमारे ९ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध मुंबईनाका, पंचवटी आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण ५ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी फिर्यादी सुरेश रणसिंग हे महामार्ग बस स्थानक, नाशिक येथून सोलापूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अशा प्रकारच्या चोरीच्या घटना बस स्थानक परिसरात सातत्याने घडत होत्या.
गर्दीचा फायदा घेत होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा बसावा यासाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव व सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांनी गुन्हे शाखा युनिट १ ला विशेष मोहिमेचे आदेश दिले होते.
पोलीस नाईक प्रशांत मरकड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मंगेश राखपसरे व निशा राखपसरे या दाम्पत्याचा संसारी गाव, देवळाली कॅम्प परिसरात वावर असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने संसारी गावाजवळील मारुती मंदिर परिसरात सापळा रचून या दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींनी चोरी केलेले दागिने एका सोनाराकडे विकल्याची माहिती देताच पोलिसांनी कारवाई करत सोन्याचे ८० ग्रॅम वजनाचे दागिने (कींमत ६ लाख रुपये) हस्तगत केले. तसेच, चोरी केलेल्या पैशातून विकत घेतलेली स्विफ्ट डिझायर कार (कींमत ३.४१ लाख रुपये) देखील जप्त करण्यात आली.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हिरामण भोये, पोउनि रविंद्र बागुल व त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.