Cidco -अंबड औद्योगिक वसाहतीतील टेक्निकल सिस्टिम कंपनीतून 1.5 कोटी रुपयांच्या उत्पादन साहित्याची चोरी. स्थानिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण, सुरक्षा उपाययोजनांवर चर्चा.”
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Cidco : अंबड औद्योगिक वसाहत चोरी
Cidco —अंबड औद्योगिक वसाहतीतील एका बंद कंपनीतून सुमारे दीड कोटी रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या महिनाभरापासून ही कंपनी बंद होती. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीची भिंत फोडून आत प्रवेश केला आणि महत्त्वाच्या उपकरणांसह विविध साहित्य लंपास केले.
संतोष बाभूळकर यांच्या मालकीची टेक्निकल सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अंबड एमआयडीसी प्लॉट नंबर ४६ येथे आहे. कंपनीत प्रामुख्याने औद्योगिक उत्पादनांसाठी लागणाऱ्या डाय व इतर यंत्रसामग्रीचा समावेश असतो.
चोरट्यांनी डायपॉवर प्रेस मशीनचे होल्डिंग फिक्चर्स, फिक्सिंग टूल्स, डाईजचे हार्डवेअर, जनरल टूल्स अँड टॅकल्स, स्क्रू ड्रायव्हर संच, ऑल स्पॅनर संच, स्पॅनरचे संच, मिटरींग बॉक्स वायरिंगचे संच, लेथ मशीन, सीएनसी मशीन, व्हीएमसी मशीन, पॉवर प्रेस मशीन, ड्रिलिंग मशीन, टॅपिंग मशीन, वेल्डिंग मशीन, बँड सॉ मशीन, अरिंग मशीन, प्लानिंग कॉपरचा कच्चा माल अशा विविध वस्तू चोरून नेल्या. चोरी गेलेल्या साहित्याची एकूण किंमत १ कोटी ५४ लाख ३८ हजार रुपये इतकी आहे.
गेल्या महिन्याभरापासून कंपनी बंद असल्यामुळे मालकाने सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली होती. मात्र, सुरक्षा रक्षक बाहेरगावी गेल्याने १४ ते २८ डिसेंबर दरम्यान चोरट्यांनी या घटनेला अंजाम दिला.
संतोष बाभूळकर यांच्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संदीप शेवाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. चोरीमध्ये सामील असलेल्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे.
या घटनेमुळे औद्योगिक वसाहतीतील इतर व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक व्यावसायिकांनी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पोलिस प्रशासनाला विनंती केली आहे.