Clash Between Two Groups at Nashik District Hospital : नाशिक जिल्हा रुग्णालयात दोन गटांत हाणामारी, दगडफेक आणि तोडफोड; परिसरात तणाव

Clash Between Two Groups at Nashik District Hospital, Stone Pelting and Vandalism; Tension in the Area

जिल्हा रुग्णालयाच्या (Nashik District Hospital) अपघात कक्षात दहशत

नाशिक : रविवारी (दि. २३) सायंकाळी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या (Nashik District Hospital) अपघात कक्षात दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाली. यामध्ये दगडफेक आणि तोडफोड केल्याने रुग्णालयातील वातावरण तणावपूर्ण बनले. या घटनेमुळे रुग्ण, नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

हल्ल्यात वैद्यकीय साहित्याची नासधूस, कर्मचारी जखमी

यामध्ये सुरक्षारक्षक, रुग्णालय कर्मचारी, परिचारिका तसेच एका महिला रुग्णाला दुखापत झाली. हल्ल्यादरम्यान मोठ्या प्रमाणात वैद्यकीय साहित्याची नासधूस करण्यात आली. जीव वाचवण्यासाठी डॉक्टर, कर्मचारी आणि रुग्ण आडोशाला लपले होते.

दोन गटांमध्ये उडाली दगडफेक आणि खुर्च्यांचा वापर

भद्रकालीतील दोन युवक उपचार घेत असताना, दुसऱ्या गटाच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. मोठे दगड, स्टूल आणि खुर्च्या फेकून रुग्णालयात दहशतीचे वातावरण पसरवले. या घटनेमुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांच्या उपस्थितीतही आरोपी फरार

घटनेनंतर सुरक्षारक्षक आणि जिल्हा रुग्णालयातील (Nashik District Hospital) पोलिस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. सरकारवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

संशयितांचा शोध सुरू

सरकारवाडा पोलिसांकडून या घटनेतील संशयितांचा शोध घेतला जात असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. रुग्णालयातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे, त्यामुळे सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्यात येण्याची शक्यता आहे.