नाशिकरोड (प्रतिनिधी): गंधर्व नगरी येथील आठ वर्षीय मूकबधिर मुलगा ओम दुधाट याच्या अनैसर्गिक अत्याचारानंतर हत्येच्या घटनेने संपूर्ण नाशिक हादरला आहे. रविवारी घडलेल्या या अमानुष प्रकाराने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, आरोपींना कठोर शासनाची मागणी होत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
घटनेनंतर पोलीस तातडीने सक्रिय झाले असून, आतापर्यंत दहा संशयितांची चौकशी करण्यात आली आहे. तपासाला गती देण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच, तपास अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत जलद कारवाईचे निर्देश दिले. त्यांनी लवकरच आरोपी हाती लागेल, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपागारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे अधिकारी उपस्थित होते.
या भयानक घटनेनंतर गंधर्व नगरी परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी निषेध नोंदवत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.