Delhi Assembly Election | 5 फेब्रुवारी 2025 – दिल्लीतील 70 विधानसभा जागांसाठी आज मतदान होत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, कारण दारू घोटाळ्याच्या आरोपांमुळे पक्ष मोठ्या अडचणीत सापडला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
(Delhi Assembly Election)भाजपचा विजयासाठी जोरदार प्रचार
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार केला असून, पक्षाच्या निवडणूक यंत्रणेने सुरुवातीपासूनच मोठी मोहीम उघडली आहे. मागील दोन निवडणुकांत आपने जोरदार विजय मिळवला असला, तरी यंदा भाजपला संधी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
काँग्रेसची पुनरागमनाची आशा
दहा वर्षे दिल्लीच्या राजकारणात बाजूला राहिल्यानंतर काँग्रेस देखील पुनरागमनाच्या प्रयत्नात आहे. पक्षाने जुन्या संघटनेला बळकट करत नव्या रणनीतीसह निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला आहे.
आपसमोर मोठ्या अडचणी, पण आत्मविश्वास कायम
दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि संजय सिंग यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. मात्र, केजरीवाल यांनी जनतेकडून “प्रामाणिकतेचं प्रमाणपत्र” मिळवण्याचा दावा करत, विजय मिळवल्यास पुन्हा मुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सरकार आणि उपराज्यपाल यांच्यातील संघर्ष
सुप्रीम कोर्टाने दिल्लीच्या निवडून आलेल्या सरकारला संपूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट केले असले, तरी केंद्र सरकारच्या अध्यादेशामुळे उपराज्यपालांना अधिक अधिकार देण्यात आले. दारू घोटाळा प्रकरणाच्या चौकशीला उपराज्यपालांनी दिलेल्या मंजुरीमुळेच केजरीवाल आणि सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती.
दिल्ली मॉडेलचा प्रभाव आणि आपच्या अस्तित्वाची लढाई
शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील विकासावर भर देत आम आदमी पक्षाने सत्ता मिळवली होती. पंजाबमध्येही हाच फॉर्म्युला यशस्वी ठरला आणि आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. मात्र, यंदा दिल्लीतील पराभव पक्षासाठी मोठा धक्का ठरू शकतो, तर विजय मिळाल्यास आप भाजपला रोखण्याची ताकद राखून आहे, हे सिद्ध होईल.
दिल्लीच्या जनतेचा निर्णय कोणाच्या पारड्यात जाईल, हे निकालानंतर स्पष्ट होईल. पण आजचे मतदान दिल्लीच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे.