Dindori bank incident ; ‘लाडक्या बहिणी’साठी बँकेत तासन्तास रांगेत; गर्भवती महिलेचा गर्भासह दुर्दैवी मृत्यू!

"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वादाच्या भोवऱ्यात; शेतकरी महिलांना अपात्र ठरवण्याचा निर्णय वादग्रस्त"

Dindori bank incident : उमराळे, ‘लाडक्या बहिणी’ योजनेच्या केवायसीसाठी बँकेत आलेल्या गरोदर महिलेस चक्कर येऊन पडल्याने तिचा व गर्भातील बाळाचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे महाराष्ट्र बँकेची शाखा असून, या शाखेत परिसरातील सुमारे 40 ते 50 गावांतील शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचे बँक खाते आहे. शासकीय योजनांचे पैसेही याच शाखेत जमा होतात. त्यामुळे येथे नेहमीच ग्राहकांची मोठी गर्दी असते. सध्या राज्य सरकारच्या ‘लाडक्या बहिणी’ योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹1,500 अनुदान मिळत असल्याने अनेक महिला बँकेत केवायसी व पैसे काढण्यासाठी येत आहेत.

गुरुवारी (30 जानेवारी) आळंदी डॅम येथील सुलभा भाऊराव लहांगे (वय 24) या 8 महिन्यांच्या गरोदर महिलेने केवायसीसाठी उमराळे येथील बँकेत हजेरी लावली. मात्र, बँकेत प्रचंड गर्दी असल्याने तिला तब्बल तीन तास रांगेत उभे राहावे लागले. या दरम्यान, ती अचानक चक्कर येऊन कोसळली. त्वरित तिला उमराळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले. तिच्यासोबत गर्भातील बाळाचाही मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुहेरी संकट कोसळले आहे.

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, गर्दीवर नियंत्रण ठेवावे, तसेच गरोदर महिलांसाठी स्वतंत्र सोय उपलब्ध करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि खातेदारांनी केली आहे.

महत्वाचे मुद्दे:गर्दीमुळे तासन्‌तास थांबावे लागत असल्याने महिलांना त्रास,बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी; व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह,गर्भवती व वृद्धांसाठी विशेष सोय करण्याची मागणी

राज्य सरकार व बँक प्रशासनाने या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. ‘लाडक्या बहिणी’च्या मदतीसाठी आलेल्या महिलेचा जीव जाणार असेल, तर ही योजना कितपत उपयोगी आहे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.