मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आमदार फरांदे रस्त्यावर उतरल्या |“अधिकाऱ्यांनी हलगर्जी केल्यास निलंबन ठरलेले!”
नाशिक: Dwarka Chowk Nashik News नाशिकच्या द्वारका चौक परिसरातील अतिक्रमणावरून राजकीय व प्रशासकीय वातावरण तापले आहे. अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापालिकेने कारवाई केली. त्यानंतर आता आमदार देवयानी फरांदे यांनी स्वतः अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह अतिक्रमणग्रस्त भागांची पाहणी केली आणि प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत “अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास त्यांना निलंबित करा” अशी स्पष्ट सूचना दिली.
अतिक्रमण हटाव मोहिमेत फरांदेंचा थेट सहभाग
Dwarka Chowk Nashik News – सोमवारी (दि. १६) आमदार फरांदे यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, वाहतूक उपायुक्त आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत द्वारका, सारडा सर्कल, फाळके रोड, शालिमार, मुंबई नाका यांसह अनेक ठिकाणी अतिक्रमणविरोधी दौरा केला.
“तुमच्याकडे वेळ नसेल, तर निलंबनासाठी तयार रहा!” – फरांदेंचा इशारा
अतिक्रमण हटवण्यासाठी मनुष्यबळाच्या कमतरतेची सबब देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी तंबी दिली की, “आऊटसोर्सिंगद्वारे कर्मचारी मिळवा, पण काम थांबता कामा नये.”
‘क्रेडिट वॉर’ : भुजबळ vs फरांदे
द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी व अतिक्रमणविरोधी कारवाईचे श्रेय कोणाचे यावरून आता ‘क्रेडिट वॉर’ची चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनी दौरा केला, नंतर फरांदेंनी बैठक घेतली, आणि दोघंही वेळोवेळी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ‘भुजबळ साहेब धन्यवाद’चे फलक झळकवले, तर फरांदेंनी अधिकाऱ्यांना थेट कारवाईचे आदेश दिले.
पाहणी दौऱ्यातील प्रमुख भाग:
- द्वारका चौक
- शालिमार चौक
- सारडा सर्कल
- फाळके रोड
- भद्रकाली
- दूधबाजार
- मुंबई नाका
- वडाळा
- डीजीपीनगर रोड
“पाठी फिरताच पुन्हा अतिक्रमण” – शालिमारमधील जुन्या चक्राची पुनरावृत्ती
शालिमार चौकातील विक्रेते आमदारांच्या पाहणीपूर्वी टपऱ्या हटवतात, आणि पाठ फिरताच पुन्हा लावतात – ही पाठशिवणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरूच आहे. अतिक्रमण हटवण्याची कारवाई फक्त फोटोपुरती मर्यादित असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.
फरांदेंचा ठाम आदेश :
- राजकीय हस्तक्षेप नको
- रस्ते रुंदीकरण तातडीने सुरू करा
- भुयारी मार्ग बंद करा
- बसथांबे आणि सिग्नल व्यवस्था लवकरात लवकर सुरू करा
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय अॅक्शन?
गेल्या आठवड्याभरात मंत्री भुजबळ आणि आमदार फरांदे दोघेही सातत्याने मैदानात उतरल्याने, ही कारवाई फक्त लोकहितासाठी की राजकीय रणनीतीचा भाग? अशी अंतर्गत चर्चा सध्या नाशिकमध्ये रंगत आहे.