द्वारका शंकर नगरसमोरील शितल सोसायटीमध्ये 23 सप्टेंबर रोजी दुपारी मोठी घरफोडीची घटना घडली आहे. दीपक विठ्ठल खलाणे यांच्या बंगल्यात दुपारी तीन ते पाच वाजण्याच्या दरम्यान ही चोरी घडली. घरातील सर्व लोक बहिणीकडे पित्र पाठ जेवायला गेले असताना, चोरट्यांनी संधीचा फायदा घेत घराचा कुलूप तोडून आत प्रवेश केला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
चोरट्यांनी घरातील सर्व कपाटांची तोडफोड केली आणि सोने व रोकड लंपास केली. दीड तोळ्याचे मंगळसूत्र आणि पंचवीस हजार रुपये रोख या चोरीत चोरट्यांनी हातोहात घेतले. ही घटना खूपच वेगाने घडली, ज्यामुळे घरातील लोकांच्या लक्षात येण्याआधीच चोरांनी आपले काम उरकले.
घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला आणि परिसरातील शेजारच्या बंगल्यांमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. सीसीटीव्हीमध्ये दोन अज्ञात व्यक्ती चारचाकी गाडीतून आलेल्या दिसल्या. त्यांनी आपली गाडी बंगल्याच्या बाजूला लावली आणि दोन्ही बंगल्यांमध्ये प्रवेश करून चोरी केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे कैद झाली आहे.
सध्या भद्रकाली पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.