भारताच्या निवडणूक प्रक्रियेसाठी असलेली आर्थिक मदत थांबवली
Elon Musk : अमेरिकेच्या ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी’ (डीओजीई) ने भारताला दिली जाणारी 2.10 कोटी डॉलरची मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मदत भारतातील मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी मंजूर करण्यात आली होती. शनिवारी डीओजीईने ही घोषणा केली असून, अमेरिकेकडून एकूण 48.6 कोटी डॉलरच्या निधीला स्थगिती देण्यात आली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
डीओजीईच्या निर्णयामागचे कारण काय?
डीओजीईने एका पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, अमेरिकी करदात्यांचा पैसा निवडणूक आणि राजकीय प्रक्रियेसाठी वापरणे थांबवण्यात येत आहे. यामध्ये भारतातील ‘कन्सोर्टियम फॉर इलेक्शन्स अँड पॉलिटिकल प्रोसेस स्ट्रेन्ग्थनिंग’ या उपक्रमाला मिळणारा निधी आणि मोल्दोवामधील राजकीय सहभाग वाढवणाऱ्या योजनांचा समावेश आहे.
भाजपने निर्णयावर उठवले प्रश्न
अमेरिकेने भारताच्या निवडणूक प्रक्रियेसाठी निधी देणे हा परकीय हस्तक्षेप असल्याचा दावा भाजपचे नेते आणि आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. त्यांनी विचारले की, या निधीचा फायदा नेमका कोणाला झाला होता? भाजपला याचा कोणताही फायदा झाला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोदी-मस्क भेटीनंतर घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना डीओजीईचे प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk)यांनी त्यांच्या सहकुटुंब भेट घेतली होती. या बैठकीला भारताच्या शिष्टमंडळातील उच्चपदस्थ अधिकारीही उपस्थित होते. या चर्चेमध्ये अवकाश, तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रांवर चर्चा झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच डीओजीईने भारताच्या निवडणूक प्रक्रियेसाठी दिली जाणारी मदत बंद करण्याचा निर्णय घेतला.
डीओजीईच्या निर्णयामुळे भारतातील निवडणूक प्रक्रियेला मिळणाऱ्या परकीय निधीबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, हा निधी थांबवण्याचा निर्णय भारताच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो का? यावर चर्चा सुरू झाली आहे.