उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत गुरुपुष्यामृतचा शुभ मुहूर्त हा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो, परंतु या वेळेला अनेक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली नसल्यामुळे हा शुभ मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. गुरुवारी (दि. २४) हा गुरुपुष्यामृतचा आणि कराष्टमीचा दिवस अर्ज दाखल करण्यासाठी अत्यंत उत्तम मानला जात होता. मात्र, काही उमेदवार अद्याप जाहीर न झाल्यामुळे किंवा काहींना बुधवारी उशिरा एबी फॉर्म मिळाल्यामुळे त्यांना आवश्यक तयारीसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गुरुवारी काही ठिकाणी फक्त काहीच उमेदवार अर्ज दाखल करू शकतील. विशेषत: लहान पक्षांचे किंवा अपक्ष उमेदवार आज डमी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही उमेदवार वकील प्रतिनिधीमार्फत डमी अर्ज भरून गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करतील. तथापि, बहुतांश मुख्य पक्षांचे उमेदवार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता बाकी असल्यामुळे सोमवारी किंवा मंगळवारी अर्ज दाखल करतील.
सोमवार (दि. २८) हा वसुबारसचा दिवस आहे, आणि मंगळवार (दि. २९) हा धनत्रयोदशीचा दिवस असल्यामुळे हे दोन्ही दिवस शुभ मानले जात आहेत. त्यामुळे या दिवसांत सर्वाधिक अर्ज दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. अर्ज दाखल करण्यासाठी एकूण सात दिवसांचा कालावधी आहे, ज्यामध्ये २७ ऑक्टोबरचा रविवार वगळता सर्व दिवस उपलब्ध आहेत.
नाशिक पश्चिम मतदारसंघातून उद्धव सेनेकडून सुधाकर बडगुजर हे मंगळवारी (दि. २९) अर्ज दाखल करतील, तर भाजपच्या उमेदवार आमदार सीमा हिरे सोमवार (दि. २८) रोजी अर्ज दाखल करतील.