नाशिक (Heavy Rain in Nashik) – रविवारी (दि. १५ जून) नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या तासाभरात १३.४ मिमी पावसाची नोंद झाली असून, सराफ बाजारासह अनेक सखल भाग जलमय झाले.
पावसाने उघड केली महापालिकेच्या कामांची पोलखोल
महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचे दावे पहिल्याच पावसात फोल ठरले. सराफ बाजार, शालिमार, सातपूर, कॉलेज रोड, मुंबई नाका, मेन रोड व उपनगरांतील रस्ते पाण्याखाली गेले. विशेषतः सराफ बाजारात नेहमीप्रमाणे यंदाही पाणी साचले, त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली.
डांबरीकरणाचे काम वाहून गेले
पंडित कॉलनी परिसरातील डांबरीकरणाचे काम पूर्ण होण्याआधीच पावसामुळे सगळा कच वाहून गेला आणि डांबर उघडे पडले. स्थानिक नागरिकांनी महापालिकेवर वेळेचे अचूक नियोजन न केल्याचा आरोप केला.
व्यवसायिक आणि वाहनधारकांची कसरत
पावसामुळे हातगाडी विक्रेत्यांना आपले साहित्य उचलून हलवावे लागले. काहींनी प्लास्टिकच्या सहाय्याने साहित्य झाकण्याचा प्रयत्न केला, तरीही वार्यामुळे नुकसान झाले. वाहनधारकांना साचलेल्या पाण्यातून वाट काढताना अडचणींचा सामना करावा लागला.
पावसाचा एकूण परिणाम:
- तासाभरात 13.4 मिमी पावसाची नोंद
- सराफ बाजार, मुंबई नाका, सातपूर, महात्मानगर परिसर जलमय
- डांबरीकरणाचे नुकतेच झालेले काम उध्वस्त
- विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान
- नागरिकांची वाहतुकीसाठी कसरत