“काचा महाग आहेत!” – मनसेच्या इशाऱ्यानंतर हॉटस्टारला मराठीत समालोचन सुरू करण्याची ग्वाही

Kacha Mahag Ahet! - Hotstar starts criticism in Marathi at the behest of MNS

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मराठी भाषेसाठी लढ्याने आज पुन्हा एकदा जोर धरला. डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर क्रिकेट सामन्यांचं मराठीत समालोचन नसल्याने मनसेने कंपनीच्या लोअर परळमधील कार्यालयावर धडक दिली. “डिस्ने हॉटस्टारच्या काचा खूप महाग आहेत,” अशी थेट धमकी मनसे चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली आणि मराठीसाठी सुरू असलेल्या या लढ्याला नवी धार दिली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

हॉटस्टारवर तमिळ, तेलुगू, मल्याळम, हरयाणवी, भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये क्रिकेट सामन्यांचे समालोचन ऐकायला मिळते. मात्र, मराठीसाठी कोणताही पर्याय नसल्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषिक क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आज, मनसेच्या नेत्यांनी हॉटस्टारच्या कार्यालयात याचा जाब विचारण्यासाठी धडक दिली.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यालयात तीन तास वाट पाहायला लावण्यात आलं. त्यामुळे तणाव वाढला आणि मनसैनिकांचा पारा चढला. या वेळी कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त होता. अखेर, हॉटस्टारकडून राकेश धोत्रे यांची भेट मनसे पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.

मनसेच्या दबावामुळे, हॉटस्टारकडून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पासून मराठी भाषेत समालोचन सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली. “मराठी भाषेच्या मागण्या मान्य करायला लावणं हे आमचं उद्दिष्ट आहे,” असे खोपकर यांनी ठामपणे सांगितले.

मराठी भाषेच्या हक्कासाठी लढा देत मनसेने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उचलून धरला आहे. “इतर भाषांमध्ये समालोचन सुरू ठेवता, मग मराठीला का डावलता?” असा परखड सवाल मनसेने हॉटस्टारला विचारला.

आता चॅम्पियन्स ट्रॉफीपासून मराठीत समालोचन सुरू झालं, तर हॉटस्टार मराठी प्रेक्षकांना खुश करेल. मात्र, या वचनाचा किती प्रभाव पडतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे!