Kshatriya Karni Sena Offers : क्षत्रिय करणी सेनेची मोठी घोषणा: कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या एन्काऊंटरसाठी १ कोटींचं बक्षीस

Kshatriya Karni Sena Offers

सलमान खानच्या मागे हात धुवून लागलेल्या कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे, ज्यामुळे तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या हत्येनंतर क्षत्रिय करणी सेनेने बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्या कोणत्याही पोलिसाला तब्बल १ कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. क्षत्रिय करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडिओद्वारे ही घोषणा केली आहे.

लॉरेन्स बिश्नोईच्या हत्येसाठी बक्षीस

राज शेखावत यांनी स्पष्ट केले की, बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्या कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यास बक्षिसाची रक्कम दिली जाईल. तसेच, केंद्र सरकार आणि गुजरात सरकारने बिश्नोईला सुरक्षा पुरवल्याबद्दल करणी सेनेने टीका केली आहे. लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातमधील साबरमती कारागृहात अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी शिक्षा भोगत आहे. याआधी एप्रिल महिन्यात सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणातही त्याचे नाव आले होते, मात्र तेव्हा मुंबई पोलिसांना त्याची कोठडी मिळाली नव्हती.

Karni Sena – @RRKarniSena

बक्षीस घोषित करण्यामागील कारण

लॉरेन्स बिश्नोईच्या डोक्यावर बक्षीस जाहीर करण्यामागे क्षत्रिय करणी सेनेचा प्रमुख नेता सुखदेव सिंह गोगामेडी यांचा खून आहे. ५ डिसेंबर २०२३ रोजी जयपूर येथे गोगामेडी यांची हत्या करण्यात आली होती, आणि काही तासांतच बिश्नोई टोळीने या हत्येची जबाबदारी घेतली होती. करणी सेनेने याच कारणामुळे बिश्नोईचा एन्काऊंटर करण्याचे आवाहन केले आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी देखील बिश्नोई टोळीने घेतली असून, बिश्नोईच्या साथीदार शुभम लोणकरने फेसबुकवर पोस्टद्वारे याची उघडपणे कबुली दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) माहितीनुसार, नव्वदच्या दशकात दाऊद इब्राहिमने जसे आपल्या टोळीचे जाळे पसरवून दहशत माजवली होती, तसेच आता बिश्नोई टोळीही देशभरात भीती निर्माण करत आहे. या टोळीचे देशभरात सुमारे ७०० शूटर्स आहेत, ज्यापैकी फक्त पंजाबमध्येच ३०० शूटर्स सक्रिय असल्याचे सांगितले जाते.

बिश्नोई टोळीच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरात चिंता निर्माण झाली आहे, आणि करणी सेनेने जाहीर केलेले बक्षीस या तणावात आणखी भर घालत आहे.