सोलापूर येथे झालेल्या मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळ्यात महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी निधी वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत राज्यातील 2.20 कोटी महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला पुढील पाच वर्षे कोणत्याही अडचणींशिवाय सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. तसेच, भाऊबीज निमित्ताने नोव्हेंबर महिन्यातील रक्कमदेखील महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “लखपती दीदी योजना” चा उल्लेख केला. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 25 लाख लखपती दीदी तयार करण्यात येणार असून, पुढील टप्प्यात 1 कोटी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज बिल माफी योजनेतून राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांचे 15 हजार कोटी रुपयांचे वीज बिल माफ करण्यात आले असल्याचे सांगितले. महिलांसाठी चालू असलेल्या विविध योजना, जसे की तीन मोफत गॅस सिलिंडर, एसटी तिकीटांवर 50% सवलत, आणि उच्च शिक्षणात शंभर टक्के फी माफी, यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळत आहे.
कार्यक्रमात सौरऊर्जिकरण प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले असून, यासाठी 3,366 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.