Maharashtra Budget 2025 : नाशिकसाठी बिग बूस्टर! महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2025

नमामि गोदावरी अभियान आणि कुंभमेळा २०२७

Maharashtra Budget 2025 : महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (१० मार्च) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या (Maharashtra Budget 2025 ). सन २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना केली जाणार असून, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

रामकाल पथ विकास प्रकल्पासाठी १४६ कोटी (Maharashtra Budget 2025)

रामकुंड, काळाराम मंदिर आणि गोदातट परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी रामकाल पथ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी १४६ कोटी १० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गाजवळ अॅग्रो-लॉजिस्टिक हब

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ९९% काम पूर्ण झाले असून, लवकरच इगतपुरी ते आमणे हा ७६ किमी लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे. महामार्गालगत अॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून, यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग आणि निर्यात हाताळणी केंद्राच्या सुविधा दिल्या जातील. याचा थेट फायदा विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल.

शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा

शिर्डी विमानतळाच्या १,३६७ कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे. या कामांमध्ये नाईट लँडिंग सुविधेचा समावेश असून, लवकरच ही सुविधा सुरू होणार आहे.

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पातून सिंचनाला चालना

नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ४९,५१६ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्प राबवला जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत ७,५०० कोटी रुपये आहे.

दमणगंगा-गोदावरी नदीजोड प्रकल्प

  • या प्रकल्पामुळे ३.५५ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे.
  • जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रातील ९,७६६ हेक्टर क्षेत्र पुनर्स्थापित होणार आहे.
  • नाशिक जिल्ह्यातील २,९८७ हेक्टर क्षेत्रालाही सिंचनाचा फायदा होईल.
  • अंदाजित खर्च २,३०० कोटी रुपये आहे.

१९,३०० कोटी रुपयांचा तापी महापुनर्भरण प्रकल्प

शासनाने १९,३०० कोटी रुपये किंमतीचा तापी महापुनर्भरण सिंचन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

नाशिकच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025)

या अर्थसंकल्पातून नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे. कुंभमेळा, पर्यटन विकास, सिंचन आणि शेतीपूरक प्रकल्पांच्या मदतीने नाशिकचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे.