महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. कांदा बियाण्यापासून ते कांदा विक्रीपर्यंतची ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी कठीण ठरत असते. कांद्याच्या उत्पादनास व विक्रीसंदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी करत, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक घेण्याची विनंती केली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांच्या सहीने २५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्रात, संघटनेने कांदा उत्पादनाशी संबंधित शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाययोजना मांडल्या आहेत. भदाणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, “देशातील सर्वाधिक कांदा महाराष्ट्रात पिकविला जातो. मात्र, शेतकऱ्यांना कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा अधिक दर मिळावा यासाठी देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठांमध्ये कांद्याची निर्यात नियमित होणे अत्यंत आवश्यक आहे.”
संघटनेच्या मते, महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादकांसाठी एक निश्चित धोरण आखावे, जे कांदा बियाण्यांपासून ते विक्रीपर्यंतच्या सर्व टप्प्यांवर मार्गदर्शन करू शकेल. त्यासाठी संघटनेने काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या असून, त्यांचे प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी, ग्राहकांसाठी आणि सरकारसाठी निश्चित सोपा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घ्यायची आहे.