मुंबई: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या मोठ्या संधी असून, विशेषतः पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी मालदीव भारताचे स्वागत करेल, असे प्रतिपादन मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांनी मंगळवारी (दि. ८ ऑक्टोबर) येथे केले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन मुंबई येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते. अध्यक्ष मुइझ्झू यांनी भारत आणि मालदीवदरम्यान दिल्ली येथे स्वीकारलेल्या ‘व्हिजन डॉक्युमेंट’चा उल्लेख करत हा दस्तावेज उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकट करेल, असा विश्वास व्यक्त केला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
अध्यक्ष मुइझ्झू यांच्या भारत भेटीच्या निमित्ताने त्यांच्या पत्नी साजिधा मोहम्मद आणि उच्चस्तरीय मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ त्यांच्यासोबत होते. या मुंबई भेटीत त्यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेत्यांशी संवाद साधला. या चर्चेत त्यांनी बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शकांना मालदीवमध्ये संयुक्त चित्रपट निर्मितीसाठी आणि चित्रीकरणासाठी येण्याचे निमंत्रण दिले.
त्यांनी मालदीवमध्ये दूरचित्रवाणी मालिकांचे चित्रीकरण करण्याच्या शक्यतेचाही विचार करावा, असे सुचवले. मालिका आणि चित्रपटांमुळे मालदीवच्या पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.भारतीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेबद्दल समाधान व्यक्त करत, अध्यक्ष मुइझ्झू यांनी पुढील वर्षी भारत आणि मालदीवमध्ये राजनैतिक संबंधांच्या ६० वर्षांच्या साजरीचा उल्लेख केला. त्यांनी मालदीवमध्ये रुपे कार्ड सुरु केल्यामुळे भारतीय पर्यटकांसाठी होणाऱ्या सुलभतेबद्दल समाधान व्यक्त केले, ज्यामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मालदीवच्या अध्यक्षांचे स्वागत करताना सांगितले की, नवी दिल्ली येथे स्वीकारलेल्या व्हिजन डॉक्युमेंटमुळे उभय देशांचे संबंध आणखी दृढ होतील.
भारताचे ‘शेजारी प्रथम’ धोरण आणि ‘सागर व्हिजन’मध्ये मालदीवला विशेष स्थान असून, दोन्ही देशांमधील सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यापार संबंध अनेक शतकांपासून मजबूत आहेत.भारत मालदीवचा एक प्रमुख व्यापार भागीदार असल्याचा आनंद व्यक्त करत, राज्यपालांनी भारतीय व्यावसायिकांना मालदीवशी व्यापार आणि सहकार्य वाढविण्यास प्रोत्साहित केले. भारतीय डॉक्टर, परिचारिका आणि शिक्षक मालदीवमध्ये उल्लेखनीय सेवा देत असल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक व्यक्त केले.औपचारिक भेटीनंतर राज्यपालांनी अध्यक्ष मुइझ्झू आणि त्यांच्या शिष्टमंडळाच्या सन्मानार्थ प्रीतीभोजनाचे आयोजन केले. या समारंभाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पश्चिम नौदल मुख्यालयाचे प्रमुख ध्वज अधिकारी व्हाईस ॲडमिरल अजय कोचर आणि भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक भीष्म शर्मा हे उपस्थित होते.
महत्त्वाचे मुद्दे
मालदीवने भारतातून पर्यटन, रिअल इस्टेट आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीचे स्वागत केले. – बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शकांना मालदीवमध्ये चित्रपट आणि मालिका चित्रीकरणासाठी निमंत्रण. – दिल्ली येथे स्वीकारलेल्या व्हिजन डॉक्युमेंटमुळे द्विपक्षीय संबंध दृढ होतील. रुपे कार्डमुळे भारतीय पर्यटकांना मदत होणार; पर्यटनाला चालना मिळेल. – भारत आणि मालदीवमध्ये सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध शतकांपासून दृढ आहेत.