मालेगाव तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. यामध्ये चार गावठी बंदुकं, ३१ जिवंत काडतुसे आणि दोन तलवारी यांचा समावेश आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संशयित शस्त्रसाठा घेऊन येणाऱ्या एका मोटारीवर पथकाने चाळीसगाव फाट्यावर सापळा रचला. मोटार थांबवली असता, तिच्यातून शाकीर पठाण (३४) आणि मोहम्मद सय्यद (२९) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्रे बाळगल्याचे कबूल केले आहे.
या कारवाईत अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी आधीच गुन्हेगार आहेत आणि त्यांच्या विरोधात नाशिक शहर व धुळे जिल्ह्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच, मालेगाव शहरातील अन्य दोन व्यक्तींवरही अवैध शस्त्रे बाळगण्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या कारवाईत ४३ व्यक्तींविरुद्ध अवैध मद्यविक्री आणि हातभट्टीच्या दारूच्या उत्पादनाबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. या यशस्वी कारवाईसाठी तपासी पथकाला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.