मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीत जागावाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या संदर्भात माहिती दिली. “आमची मनापासून इच्छा आहे की, आजच जागावाटपाचा तोडगा निघावा. आम्ही सर्व पर्यायांचा विचार करून अंतिम निर्णय घेणार आहोत,” असे पटोले यांनी सांगितले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
“माझे पंख छाटले नाहीत”
पटोले यांनी त्यांच्या नेत्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत सांगितले की, “माझे पंख छाटले नाहीत, मी अजूनही आमचे मुद्दे ठामपणे मांडत आहे. पक्षातील काही आडचणी असल्या तरी ते त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत आणि पक्षातील भूमिका ठामपणे मांडत राहतील.
पटोले यांनी माहिती दिली की, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना त्यांनीच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे चर्चा करण्यासाठी पाठवले होते. या चर्चेमुळे महाविकास आघाडीतील जागावाटपावर निर्णय घेण्यात मदत होईल, अशी अपेक्षा आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“आजच्या बैठकीत मार्ग निघेल आणि जागावाटपाचा निर्णय पूर्ण होईल,” असे पटोले यांनी ठामपणे सांगितले. मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळू शकतो. या बैठकीत आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन निवडणुकीच्या जागांचे वाटप अंतिम करतील, अशी आशा आहे.
मागील काही आठवड्यांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्यात जागावाटपावरून चर्चा सुरू आहे. आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या बैठका व त्यामधील चर्चेच्या फेऱ्यांमुळे जागावाटपाचा तिढा काहीसा सुटला आहे, मात्र अजूनही काही मुद्द्यांवर चर्चा करणे गरजेचे आहे. पटोले यांच्या वक्तव्यानंतर या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन निवडणुकीची तयारी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.