History Of Nashik Modakeshwar Ganpati Temple : “मोदकेश्वर गणपती मंदिर – नाशिकचे अद्भुत स्वयंभू गणेश मंदिर”

"Modakeshwar Ganpati Idol in Nashik, a unique self-manifested Ganesha murti with a modak-like shape, adorned with silver ornaments, a crown, and traditional decorations."

“सततं मोदक प्रिय..”मोदकेश्वर गणपती मन्दिर (Modakeshwar Ganpati)

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

असं म्हटलं जातं की मनुष्य जन्माचे सार्थक होण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत.

पहिली.. शरीर शुद्ध होणे.. आणि त्यासाठी आवश्यक आहे गोदावरीचं स्नान.

दुसरी.. चित्त शुद्ध होणे.. त्यासाठी आवश्यक आहे मोदकेश्वराचे दर्शन(Modakeshwar Ganpati).

खरंच आहे हे. गोदावरीच्या काठी असलेलं मोदकेश्वराचं हे स्थान बघितल्यावर माणसाचं..मन,चित्त प्रफुल्लित होऊन जातं.दर्शनी भागात असलेल्या त्या लाकडी जाळ्या.. आत प्रवेश केल्यानंतर दिसणाऱ्या भक्कम, दगडी ओवर्या..वर्षोनुवर्षे तेथे दुर्वा, फुले विकणाऱ्या आज्जी.यि भव्य मठाला तोलुन धरणारे सुबक लाकडी खांब.. समोरचं तुळशी वृंदावन.. त्यामागे असलेल्या कमानीत विराजमान झालेली नारायणाची मुर्ती.

Shri Modakeshwar Ganpati Temple in Nashik, a historic Ganesh temple with a vibrant red, yellow, and purple exterior, featuring traditional wooden doors and windows."
History of Modakeshwar Ganpati Temple

प्रथम दर्शनीच जाणवतं..या स्थानात काहीतरी वेगळं आहे. तीन पायऱ्या उतरुन आपण खाली येतो.समोरच दिसतो भव्य नंदी त्याचं दर्शन घेऊन थोडंसं वाकुन नतमस्तक होऊन आत जातो तो दिसतं काशी विश्वेश्वराचं पवित्र शिवलिंग.

नंदी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण अजुन एक पायरी खाली उतरतो..तो समोर दिसतो मोदकेश्वर(Modakeshwar Ganpati). .चार लाकडी खांबांच्या लहानश्या मंडपात असलेली ती शेंदुर विलेपीत स्वयंभु मुर्ती. अगदीच मोदकाच्या आकाराचीच.त्यावर हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या..रक्तवर्णी जास्वंद..

समोरच गोदामाईचा संथ प्रवाह वाहतो आहे.. पुर्वेकडुन येणारी पिवळसर कोवळी किरणे मुर्तीला सुर्यस्नान घालत आहे.. मुखाने अथर्वशीर्षातील ऋचा म्हणत भाविक प्रदक्षिणा घालत आहेत हे रोजचे दिसणारे चिरपरिचित द्रष्य.

या गणपतीला मोदकेश्वर का म्हटले जाते?ती एक आख्यायिका आहे. अशाच एका सुंदर सकाळी बालगणेश फिरायला म्हणुन बाहेर पडला होता.दोन्ही हातात आईने दिलेले ताजे, उकडीचे गरम मोदक. आकाशातुन विहार करताना त्याला जाणवलं..इकडची हवा किती सुखद आहे..संथपण वहाणारं गोदावरीचं निळंशार पाणी आहे.. ते बघत असतानाच त्याच्या हातातील मोदक खाली पडला.खाली जाऊन उचलावा की नाही असा विचार त्याने केला.. पण दुसऱ्या हातात अजुन एक मोदक होता.त्यामुळे त्यानं तो उचलला नाही.

इकडे खाली पडलेला तो मोदक गणेशाचा प्रसाद मानुन..गणेशाचं रुप मानुन त्याची एका मंदिरात विधीवत स्थापना करण्यात आली.. तोच हा मोदकेश्वर .

वंशपरंपरेने या मंदिराचे पुजाधिकारी असलेले क्षेमकल्याणी कुटुंब येथील देखभाल बघतात. घरात मंगलकार्य निघाले की प्रथम आमंत्रणाच्या अक्षता घेऊन नाशिककर येतात ते मोदकेश्वर मंदिरातच.

।।लंबोदर नमस्तुभ्यं सततं मोदक प्रिय।।
।।निर्विघ्न कुरुमे देवं सर्व कार्येषु सर्वदा।।

असं म्हणुन आपल्या यंदाच्या गणेशोत्सवाची सुरवात या मोदकेश्वर दर्शनाने करु या.

गणपती बाप्पा मोरया.

✒लेखक:-सुनील शिरवाडकर.
९४२३९६८३०८.

संकलन- मनाली गर्गे